<
| मुख्य पृष्ठ | शाखा | अभिप्राय | करीयर | आमच्याशी संपर्क साधा | साइट मॅप |


                                           









बँकेचा इतिहास

दि डेक्कन मर्चंन्टस् को-ऑप. बॅंक लि. ही मुंबईमधील एक अग्रगण्य सहकारी बॅंक आहे. बॅंकेचे कार्यक्षेत्र संपुर्णं महाराष्ट्र असून शाखा विस्तार मुंबई, नवी मुंबई , ठाणे आणि पुणे असा आहे. मुख्य कार्यालय, मध्यवर्ती कार्यालय आणि तेरा शाखा असा बँकेचा कार्यविस्तार आहे. अशा या आपल्या बँकेला ९९ वर्षाची प्रदिर्घ परंपरा लाभली असून सन २०१७ मध्ये बॅंक आपला शतकोत्सव साजरा करणार आहे. गेली ९९ वर्षे जनसामान्यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या आपल्या बॅंकेच्या वाटचालीचा आढावा पुढीलप्रमाणे सादर करीत आहोत.

पुर्वीपासूनच मुंबई शहर हे भारताची आर्थिक राजधानी म्हणू्न ओळखले जाते. अनेक उद्योगधंदे, कारखाने आणि त्या अनुशंगाने मोठया प्रमाणात आर्थिक व्यवहार मुंबईत त्याकाळी सुध्दा होत असत. मुंबईची लोकसंख्या तेव्हा साधारण १४ ते १५ लाख इतकी होती आणि त्यापैकी तीन चतुर्थांश लोकसंख्या मराठी माणसांची होती. मराठी माणुस प्रामुख्याने मोलमजुरी, नोकरी, लेखन व्यवसाय, वकिली व डॉक्टरी यासारखे व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह करीत होता. व्यापारी आणि कारखानदारीच्या पेशात मराठी माणसे कमीच होती.

मराठी व्यापारी धंदेवाल्यांना पदोपदी भांडवल पुरवठयाची अडचण भासत आहे आणि ती दूर केल्याशिवाय मराठी लोकांचा व्यापार उदिम स्थिर पायावर उभा राहणार नाही आणि वाढीला तर मुळीच लागणार नाही याची सुशिक्षित मराठी व्यापाऱ्यांना जाणीव झाली.

याच पार्श्वभूमीवर १६ एप्रिल १९१४ रोजी सायंकाळी काही कापडवाले, छापखानेवाले, पुस्तक प्रकाशक व विक्रेते आणि औषधाचे विक्रेते असे मराठी व्यापारी एकत्र जमले व "डेक्कन मर्चंन्टस् असोसिएशन" या नावाची एक संस्था त्यांनी स्थापन केली. "डेक्कन मर्चंन्टस् " म्हणजेच दक्षिणी (मराठी) व्यापाऱ्यांची संघटना असे या संघटनेचे प्रारुप होते.

डेक्कन मर्चंन्टस् असोसिएशनच्या सभासदांची एक सभा दिनांक २०-०८-१९१७ रोजी बोलविण्यात आली. या सभेत सहकारी स्वरुपाची एक सोसायटी काढावी असे ठरले. सभेचे अध्यक्षपद अर्थशास्त्रज्ञ कै. श्री. चिंतामणराव तथा तात्यासाहेब सामंत यांनी भूषविले आणि त्यांच्याच आशीर्वांदाने बॅंकेच्या स्थापनेची मुहुर्तमेढ रोवण्यात आली.

अशाप्रकारे प्रथम डेक्कन मर्चंन्टस् को-ऑप. सोसायटीची स्थापना ३० ऑगस्ट १९१७ रोजी झाली व नंतर सन १९२९ सालच्या दिवाळीत दिपोत्सवी पाडव्यास म्हणजे बलिप्रतिपदेच्या सुमूहुर्तावर सोसायटीचे रुपांतर डेक्कन मर्चंन्टस् को-ऑप. बँकेत करण्यात आले आणि बॅंकेच्या कार्याचा रितसर प्रारंभ करण्यात आला. प्रथम बॅंकेची गिरगांव येथे एकच शाखा होती. ऑगस्ट , १९३७ साली बॅंकेची दादर शाखा उघडण्यात आली.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर बॅंकेची गती वाढत गेली. सन १९१७ मध्ये रु. ३७५ इतक्या भांडवलाने सुरू झालेल्या बॅंकेचे भाग भांडवल सन १९५७ मध्ये रु. १.२५ लाख एवढे झाले व ठेवी रु. २९.०५ लाखांपर्यत पोहोचल्या. मात्र बॅंकेची खर्‍या अर्थाने प्रगतीची वाटचाल १९६८ पासून सुरू झाली. बॅंकेची प्रगती व कार्यंप्रणाली यांचे प्रशस्तीपत्रक म्हणून रिझर्व्ह बँकेने गोरेगांव येथील आर्थिक अडचणीत आलेली "कलाविहार सहकारी बॅंक" संम्मिलित करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळास दिला आणि त्यानुसार २३ डिसेंबर, १९७८ रोजी सदर बॅंक आपल्या बँकेत संम्मिलित करण्यात आली व आपल्या बॅंकेची गोरेगांव शाखा सुरू झाली.

आपल्या बँकेचा पुढीलप्रमाणे शाखा विस्तार झाला.


अ.क्र. शाखा सुरू झाल्याचा दिनांक
गिरगांव १९ जुलै, १९२९
दादर ऑगस्ट, १९३७
भायखळा २२ एप्रिल, १९६६
घाटकोपर-पश्चिम २० जूलै, १९७८
गोरेगांव २३ डिसेंबर, १९७८
बोरीवली २५ मे, १९८५
दहिसर ३१ मे, १९८६
घाटकोपर-पूर्व १९ ऑगस्ट, १९९०
वाशी २४ मे, २००४
१० ठाणे २८ मे, २००९
११ खारघर २७ डिसेंबर, २००९
१२ हडपसर,पुणे १६ जानेवारी, २०११
१३ सासवड,पुणे ३० नोव्हेंबर, २०११

बॅंकेच्या ९९ वर्षाच्या कारकिर्दीत बँकेने बरेच चढउतार पाहिले. बँकेला या कालावधीत पुढीलप्रमाणे अध्यक्ष लाभले. बॅंकेच्या प्रगतीत या सर्वांनी आपापल्या परीने योगदान दिले.

अ.क्र. सन नाव
१९१७ ते १९२० कै. श्री. चिंतामणराव तथा तात्यासाहेब सामंत
१९२० ते १९२३ कै. श्री. केशव बाळकृष्ण जोशी
१९२४ ते १९२९ कै. डॉ. शंकर रामकृष्ण माचवे
१९२९ कै. श्री. गोविंद नारायण पोतदार
१९३० कै. श्री. धर्मवीर शंकर कृष्णा पुप्पाला
१९३१ कै. डॉ. मोतीराम बाळकृष्ण वेलकर
१९३२ ते १९३६ कै. श्री. गणेश हरी पेठे
१९३६ ते १९५० कै. डॉ. मोतीराम बाळकृष्ण वेलकर
१९५० ते १९५३ कै. डॉ. विठ्ठल बाळकृष्ण गांधी
१० १९५३ ते १९५८ कै. श्री. वामन वासुदेव वाघ
११ १९५८ (६ महिने) कै. श्री. वामन पुंडलिक वर्दे
१२ १९६० ते १९६५ कै. श्री. विनायक दत्ताराम दळवी
१३ १९६५ ते १९८४ कै. श्री. शांताराम महादेव डहाणूकर
१४ १९८४ ते १९८६ कै. श्री. दत्तात्रय दामोदर काळे
१५ १९८७ ते फेब्रुवारी, १९९३ कै. श्री. प्रमोद जगन्नाथ वैद्य
१६ मार्च, १९९३ ते ऑक्टोबर, १९९४ श्री. प्रकाश आत्माराम अत्रे
१७ नोव्हेंबर, १९९४ ते जानेवारी, १९९७ कै. श्री. लक्ष्मण महादेव खडतरे
१८ फेब्रुवारी, १९९७ ते नोव्हेंबर, १९९८ श्री. विनोदकुमार तखतमल कच्छारा
१९ डिसेबर, १९९८ ते डिसेबर, २००१ कै. श्री. प्रमोद जगन्नाथ वैद्य
२० जानेवारी, २००२ पासून श्री. काशिनाथ दिनकर मोरे

१९९२ साली बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली. गिरगांव शाखेत संगणक सेवेचा प्रारंभ केला आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने बॅंकेच्या सर्व शाखा आणि कार्यालये संगणकीकृत करुन बॅंकेचे संपुर्ण संगणकीकरण करण्यात आले.

सन १९९० मध्ये घाटकोपर-पूर्व शाखा उघडल्यानंतर विविध कारणांमुळे बँकेचा शाखा विस्तार होऊ शकला नाही. बॅंकेची प्रगती होत होती परंतू विस्तार नसल्यामुळे या प्रगतीला म्हणावी तशी गती मिळत नव्हती. सन २००२ मध्ये बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष, श्री. काशिनाथ दिनकर मोरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी प्रथम बॅंकेच्या शाखाविस्ताराच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन बँकेला वाशी येथे नवीन शाखा उघडण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली. दिनांक २४ मे, २००४ रोजी माजी उपमुख्यमंत्री, मा. श्री. छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते बॅंकेच्या वाशी शाखेचे उदघाटन झाले. एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये असलेली हि शाखा आज बॅंकेची सर्वात जास्त व्यवसाय करणारी शाखा आहे.

आपल्या बॅंकेचे संगणकीकरण झाले असले तरी बॅंकेच्या संगणक प्रणालीत एकसूत्रता नव्हती. विविधप्रकारची सॉप-टवेअर बॅंकेमध्ये कार्यरत असल्याने कामकाजात अडचणी येत होत्या. त्यामुळे संपुर्ण बँकेसाठी एकच सॉप-टवेअर खरेदी करण्याचा विचार पुढे आला आणि त्यावर विचार विनिमय झाला असता जर आपण सॉप-टवेअर बदलतच आहोत तर बँकींग क्षेत्रातील अद्ययावत असे कोअर बँकींग सॉप-टवेअर का कार्यान्वित करु नये असा विचार करुन सन २००५-०६ मध्ये संचालक मंडळाने बॅंकेच्या संगणक प्रणालीचे कोअर बँकींग संगणक प्रणालीमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला.

याच वर्षी बॅंकेच्या गिरगांव इमारतीतील भाडेकरू मे. बॉम्बे बुक डेपो यांच्याकडून त्यांच्याकडे असलेली तळमजल्यावरील जागा बँकेने ताब्यात घेतली व कालांतराने ग्राहकांच्या सोईसाठी या जागेत बॅंकेची गिरगांव शाखा पहिल्या मजल्यावरून स्थलांतरीत करण्यात आली.

बॅंकेच्या कामकाजात एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला. सर्वच स्तरावर बॅंक प्रगती करु लागली. बॅंकेच्या कामाची पोचपावती म्हणून राष्ट्रीय सहकारिता विकास तथा ग्रामीण प्रबंधन संस्था या नामांकित राज्यस्तरीय संस्थेने बँकेस महाराष्ट्र राज्यातील एक अत्यत्कृष्ट संस्था म्हणून दिनांक २६ जानेवारी , २००६ रोजी सन्मानित केले. तसेच उत्कृष्ट कामकाजाबद्दल बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक असोसीएशनेही आपल्या बँकेला सलग दोन वर्षे सन्मानित केले.

दरम्यानच्या काळात बॅंकेचे शाखा विस्ताराचे प्रयत्न सुरुच होते परंतू महाराष्ट्र सरकारने रिझर्व्ह बॅंकेबरोबर सामंजस्य करारावर सह्या न केल्याने रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांना नवीन शाखाचे परवाने देण्यास स्थगिती दिली होती. त्यामुळे सन २००४ ते २००९ या कालावधीत बँकेचा शाखा विस्तार झाला नाही. सामंजस्य करार झाल्यानंतर बॅंकेची ठाणे व खारघर येथे शाखा उघडण्यात आली. ठाणे शाखेचे उदघाटन मा. उपमुख्यमंत्री ना. श्री. छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्यानंतर दिनांक २७ डिसेंबर, २००९ रोजी मा. ना. श्री. गणेशजी नाईक यांच्या हस्ते खारघर शाखेचे उदघाटन करण्यात आले.

त्यावेळेस आपल्या बॅंकेचे कार्यक्षेत्र मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि रायगड असे होते. कार्यक्षेत्रातील इतर सर्व क्षेत्रात बँकेने शाखा उघडल्या होत्या परंतू पुणे जिल्ह्यात बॅंकेची शाखा नव्हती सन २०११ मध्ये बँकेने हडपसर येथे शाखा उघडून पुणे जिल्ह्यात पदार्पण केले. दिनांक १६ जानेवारी २०११ रोजी मा. उपमुख्यमंत्री, ना. श्री. अजितदादा पवार यांच्या हस्ते हडपसर शाखेचे उदघाटन करण्यात आले आणि दिनांक ३० नोव्हेंबर, २०११ रोजी त्यांच्याच हस्ते बॅंकेच्या सासवड शाखेचे उदघाटन करण्यात आले. सन २०१२ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या बॅंकेचे कार्यक्षेत्र संपुर्ण महाराष्ट्र केले.

आर्थिक स्तरावर् बॅंकेची उत्तरोत्तर प्रगती होतच होती आणि त्याचबरोबर तंत्रज्ञान व ग्राहक सेवेमध्येही बॅंक प्रगती करत होती. सन २००७-०८ मध्ये बँकेने घाटकोपर-पूर्व व बोरीवली शाखेमध्ये एटीएम सेंटर सुरू करुन खातेदारांना एटीएमची अद्ययावत सेवा देण्याचा शुभारंभ केला. त्यानंतर बॅंकेच्या गिरगांव , ठाणे, खारघर, हडपसर , सासवड आणि गोरेगांव या शाखांमधून एटीएम सेवा सुरू करण्यात आली.

बँकेने जरी एटीएम सेवा सुरू केली असली तरीसुध्दा ती बॅंकेच्या स्वत:च्या एटीएम पूरतीच मर्यादित होती. आपल्या खातेदारांना मर्यादित स्वरुपाची सेवा उपलब्ध असल्याबदद्ल बॅंकेचे अध्यक्ष, मा. श्री. काशिनाथ मोरे यांना खंत होती. देशभरात कुठूनही आपल्या खात्यातील रक्कम काढण्याची सुविधा आपल्या खातेदारांना मिळाली पाहिजे अशी त्यांची इच्छा होती आणि त्या अनुशंगाने विविध स्तरावर ते प्रयत्न करत होते . त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन दिनांक २८-०६-२०१४ रोजी बॅंकेची रूपे कार्ड सेवा सुरू करण्यात येऊन या सेवेद्वारे रूपे नेटवर्क मध्ये असणाऱ्या इतर बँकाच्या जवळपास १ लाख ६६ हजारपेक्षा जास्त एटीएमचा वापर बॅंकेचे खातेदार करु लागले.

खातेदारांना सरकारी आणि व्यापारी बॅकांप्रमाणेच सर्व अद्ययावत सुविधा मिळाव्यात यासाठी बॅंकेच्या संचालक मंडळाने नेहमीच प्रयत्न केले. सन २००९ पासून आपली बॅंक खातेदारांना आरटीजीएस व एनईएफटी सेवा देत आहे. बॅंकेच्या दादर, भायखळा आणि ठाणे शाखेमार्फ़त फ्रँकिंग सुविधा देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन वॅट पेमेंट, भारतातील प्रमुख शहरावर डिमांड ड्राफ्ट काढण्याची सुविधा, सेफ डिपॉझिट लॉकर सुविधा, प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना , आधार लिंक सेविंग अकाउंट , सर्वसाधारण विमा तसेच जीवन विमा सुविधा अशा अद्ययावत सुविधा बॅंक ग्राहकांना देत आहे आणि बँकींग क्षेत्रातील कोणत्याही सुविधेपासून आपले सभासद व खातेदार वंचित राहू नयेत यासाठी संचालक मंडळ सातत्याने प्रयत्नशील आहे.

बॅंकेचे डाटासेंटर दहिसर येथे असून बॅंकेच्या सर्व शाखा डाटासेंटरला जोडण्यात आल्या आहेत. शाखा व कार्यालयाचे काम विनाखंड चालावे या करीता महानगर टेलिफोन निगम आणि एअरटेल या दोन कंपन्यांच्या लिझलाईन कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. याही पलिकडे आपला डाटा सुरक्षित रहावा आणि कोणत्याही परिस्थितीत बॅंकेच्या कामकाजात खंड पडू नये यासाठी डिसेंबर , २०१४ पासून बॅंकेची अद्ययावत व प्रशस्त अशी डिझास्टर साईट हडपसर -पुणे येथे उघडण्यात आली आहे. अन्य बॅंकेच्या डाटासेंटर किवा डिझास्टर साईटची भाडेतत्वावर उभारणी करता येईल अशाप्रकारे या जागेचे नियोजन करण्यात आलेले आहे.

बॅंकेच्या प्रगतीत कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. संचालक मंडळाने त्याची जाण ठेवून कर्मचाऱ्यांना सर्व सोई व सवलती उपलब्ध करुन दिल्या आहेत. विविध प्रकारच्या प्रशिक्षणाद्वारे कर्मचारी व अधिकारी वर्गाला प्रशिक्षण देण्यात येत अहे. बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांना बँकींग तंत्रज्ञानाची पूर्ण माहिती असून अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे ते ग्राहकांना समाधाकारक आणि तत्पर सेवा देत आहेत व त्यामुळे बॅंकेच्या व्यवसायात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

बॅंकेचे अध्यक्ष, मा. श्री. काशिनाथ दिनकर मोरे यांचे कुशल व खंबीर नेतृत्व बँकेला लाभले आहे. त्यांच्या कार्यकाळात बॅंकेची खर्‍या अर्थाने वाढ झाली असून त्यांच्या नेतृत्वावर सभासदांचा अतूट विश्वास आहे आणि त्यामुळेच सन २००९ आणि सन २०१५ मध्ये बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणुक बिनविरोध झाली.

बँकेचा रौप्य महोत्सव १९ सप्टेंबर , १९४२ रोजी वनिता विश्राम जवळील बागेत मंडप घालून साजरा करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्ष स्थानी भोर संस्थानाचे नरेश राजा सर रघूनाथ पंतसचिव हे होते. त्यानिमित्त संबंधित प्रतिष्ठितांना ताजमहल हॉटेलमध्ये भोजन देऊन समारंभाची सांगता करण्यात आली.

बँकेचा सुवर्ण महोत्सव दिनांक ३ एप्रिल , १९६८ रोजी वनमाळी हॉल, दादर येथे खास समारंभ आयोजित करुन साजरा करण्यात आला. या समारंभास मा. श्री . स. का. पाटील हे अध्यक्ष व त्या वेळेचे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना. श्री. बाळासाहेब देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या समारंभाच्या वेळेस त्यांनी बँकेस "असमर्थास समर्थ करणे" हे बोधवाक्य सुचविले आणि याच बोधवाक्यानुसार बॅंकेची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

बँकेचा अमृत महोत्सव दिनांक १० ऑक्टोबर व ११ ऑक्टोबर १९९२ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर येथे साजरा करण्यात आला. दिनांक १० ऑक्टोंबर १९९२ रोजी मुंबईतील सहकारी बँकामधील कार्यकर्त्याचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उदघाटन विरोधी पक्षनेते मा. श्री. गोपीनाथराव मुंडे यांच्या हस्ते झाले. दिनांक ११ ऑक्टोंबर १९९२ रोजी अमृत महोत्सवाचा सांगता समारंभ झाला. त्यास महाराष्ट्राचे वित्तमंत्री, ना. श्री. रामराव आदिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सन २०१७ मध्ये बॅंक शतकपुर्ती करणार आहे. शंभर वर्ष सभासद , खातेदार, ठेवीदार आणि ग्राहकांनी जो अतूट विश्वास बँकेवर दाखविला त्याचा दिमाखदार सोहळा बँकेतर्फे करण्यात येणार आहे. विविध कार्यक्रम आणि उपक्रम या सोहळ्याच्या निमित्ताने करण्यात येणार आहे आणि बॅंकेची यशस्वी वाटचाल अशीच निरंतर सुरू राहणार आहे याची बॅंकेचे सभासद, खातेदार, ठेवीदार आणि ग्राहक संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाला खात्री आहे.


map

पत्ता : २१७, राजा राममोहन रॉय रोड,
गिरगांव,मुंबई-
४०० ००४